
अलिबाग (प्रतिनिधी): तालुक्यातील वडवली आदिवासीवाडी येथे होणारा बालविवाह पोयनाड पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत रोखला आहे. या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलाचा विवाह थांबवण्यात पोलिसांना यश आले असून, सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
पोयनाड पोलिस ठाण्याला ११ मे २०२६ रोजी वडवली आदिवासीवाडी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिस पाटील परशुराम कृष्णा पाटील यांनी दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आर. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे लग्नाची संपूर्ण तयारी सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी नवरा-नवरीच्या वयासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली असता, नवरीचे वय पूर्ण असल्याचे आधारकार्डावरून स्पष्ट झाले. मात्र, नवरदेवाकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र उपलब्ध नव्हते. चौकशीदरम्यान त्याची जन्मतारीख १ मे २००६ असल्याचे समोर आले. त्यामुळे विवाहासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देत समुपदेशन केले. अल्पवयीन मुलाचा विवाह केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव करून दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी हा विवाह तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुलाचे कायदेशीर वय पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे आश्वासनही दिले.
या प्रकरणात पोलिस अधीक्षक कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलिसांनी तत्परता दाखवत महत्त्वपूर्ण कारवाई केली. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एक बालविवाह रोखण्यात यश आले असून, या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






