महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट? “२२ आमदारांसह सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपच्या चिन्हावर लढणार” – रोहित पवारांचा दावा


मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणारे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत हालचालींवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तब्बल २२ आमदारांसह थेट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर दावा केला आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील सत्तासमीकरणे वेगाने बदलत असून अनेक आमदार आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी भाजपकडे झुकत आहेत. त्यांनी असा आरोप केला की, केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही आमदारांनाही भाजपकडून ऑफर देण्यात येत आहेत.
यावेळी त्यांनी मावळ मतदारसंघाचाही विशेष उल्लेख केला. “मावळचा आमदार देखील भाजपमधूनच निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे,” असा दावा करत त्यांनी महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याचे म्हटले.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून अद्याप या दाव्यांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी महायुतीतील जागावाटप, पक्षांतर आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, विरोधकांनी या घडामोडींवरून भाजपवर “मित्रपक्ष संपवण्याचे राजकारण” केल्याचा आरोप केला आहे. आगामी काही दिवसांत या दाव्यांवर संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.