रायगड (प्रतिनिधी): इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. वाढत्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले असून, प्रशासनातील अधिकारीदेखील त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना दिसत आहेत. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्वतः प्रवासासाठी चालण्याचा पर्याय स्वीकारत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
“इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. आपण स्वतःपासून बदल सुरू केल्यास त्याचा सकारात्मक संदेश समाजात जातो. मी स्वतः प्रवास चालत करत आहे. शासनाचे निर्देश केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसत आहे,” असे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्याची झळ भारतालाही बसत आहे. त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने ‘वर्क फ्रॉम होम’, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, अनावश्यक प्रवास टाळणे अशा उपाययोजना सुचवल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःपासून या मोहिमेची सुरुवात केल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचत या दुहेरी उद्दिष्टांसाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.





