अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. पावसाच्या हलक्या सरींमुळे उष्णतेपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
संध्याकाळच्या वेळी पडलेल्या या पावसाचा आनंद नागरिकांनी मनमुराद लुटला. अनेकांनी घराबाहेर पडून पावसाचा आनंद घेतला, तर काहींनी सोशल मीडियावर पावसाच्या सरींचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. पावसामुळे वातावरण प्रसन्न झाले असून आगामी मान्सूनच्या आगमनाची चाहूलही नागरिकांना लागली आहे. रिमझिम सरींमुळे शहरातील तापमानात काही प्रमाणात घट झाल्याने अलिबागकरांना सुखद गारव्याचा अनुभव मिळाला.






