आदर्श पतसंस्थेकडून मृत कर्जदाराच्या वारसांना १० लाख रुपयांची अपघात विमा भरपाई


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद कर्जदार स्वर्गीय रघुनाथ विष्णू पाटील यांच्या वारसांना न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीमार्फत अपघात विमा पॉलिसीअंतर्गत १० लाख रुपयांच्या विमा भरपाईचा धनादेश प्रदान करण्यात आला.
रघुनाथ पाटील यांनी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या संजीवनी योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासोबत पतसंस्थेने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीकडून त्यांचा अपघात विमा उतरविला होता. दरम्यान, सर्पदंशामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर संबंधित विमा दाव्याची प्रक्रिया पूर्ण करून न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने १० लाख रुपयांची विमा भरपाई मंजूर केली.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय रघुनाथ पाटील यांच्या पत्नी रविना रघुनाथ पाटील, त्यांचा मुलगा व इतर नातेवाईक यांच्याकडे १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, तज्ज्ञ संचालक संजय राऊत, सहकार भारती सहकार प्रशिक्षणचे महामंत्री डॉ. उदय जोशी, तसेच न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर शशिकला श्रीधरन, रिजनल मॅनेजर किशोर सूर्यवंशी, चीफ बिझनेस मॅनेजर किशोर पाटील आणि बिझनेस असोसिएट श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
यापूर्वीही आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या सहकार्याने तीन सभासद कर्जदारांच्या वारसांना अपघात विमा भरपाई देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील सुमारे २० ते २२ सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभासद कर्जदारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या विमा योजनांचा अवलंब करण्याचे आवाहन न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित प्रतिनिधींना केले. या उपक्रमामुळे कर्जदारांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होत असून सहकार क्षेत्रात विमा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.