जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेचा हेळसांडपणा उघड?


डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांचा संताप
संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी
अलिबाग(प्रतिनिधी): अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नागरिकाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अलिबागमधील खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर दोन डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यापूर्वी आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे रुग्णाची प्रकृती आणखी गंभीर झाल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यानंतरही त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला. विभागात उपस्थित असलेल्या महिला डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचारासंदर्भात मार्गदर्शन घेत होत्या. मात्र, वरिष्ठ डॉक्टरांकडून सूचना येईपर्यंत मौल्यवान वेळ वाया गेला आणि रुग्णाची प्रकृती अधिक खालावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
नातेवाईकांच्या आरोपानुसार, उपचारास विलंब झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ उपचार सुरू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. अखेर रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर नातेवाईकांचा संताप अनावर झाला.
या घटनेनंतर अतिदक्षता विभागाबाहेर नातेवाईकांनी तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेत डॉक्टरांना जाब विचारला. “ड्युटीवर असल्याची नोंद करून प्रत्यक्षात अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. रात्री सुमारे २ वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागविला. नातेवाईकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप आंदोलकांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन व अतिदक्षता विभागातील कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी मृत रुग्णाच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्यसेवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
********

“सदर प्रकरणाची चौकशी करून सविस्तर माहिती घेतली जाईल. चौकशीत कोणतीही चूक निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.” – डॉ. शीतल जोशी, सहाय्यक सिव्हिल सर्जन.