अलिबाग (प्रतिनिधी): सभेत स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या संमतीशिवाय किंवा सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करू नये, अशी ठाम भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी मांडली. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत असून, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरण कंपनीने ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्याऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दबाव टाकण्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. वीज ही नागरिकांची मूलभूत गरज असून, त्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेताना ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक असल्याचे घरत यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, तसेच नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती घरत यांनी दिली. सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर लढा उभारला जाणार असून, नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या विषयावर आगामी काळात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Home ताज्या बातम्या स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शेकाप आक्रमक; न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा






