चेंढरे ग्रामपंचायतीला पंडितशेठ पाटील यांची अचानक भेट; विविध समस्यांवर प्रशासनाला धारेवर


अलिबाग (प्रतिनिधी): माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी चेंढरे ग्रामपंचायतीला अचानक भेट देत ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामांची आणि नागरी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
पाहणीदरम्यान गावातील विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा, नाल्यांची अपुरी सफाई, तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या याबाबत नागरिकांकडून माहिती घेतली. अनेक भागांत स्वच्छतेचा अभाव आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता संबंधित ग्रामसेवक उपस्थित नसल्याचे आढळून आले. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत पंडितशेठ पाटील यांनी तत्काळ गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. चेंढरे गावातील विविध समस्यांची सविस्तर माहिती देत संबंधित बाबींकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
गावातील स्वच्छता, नालेसफाई, पाणीपुरवठा आणि सुरू असलेल्या बांधकामांची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांबाबत अधिक जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी स्थानिक नागरिकांनीही आपल्या विविध समस्या माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांशी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.