धोकवाडे फाट्यावर दोन चिंचेची झाडे कोसळली; पाटील दाम्पत्य, पोलिस व स्वयंसेवकांच्या प्रयत्नांनी रस्ता झाला मोकळा


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील धोकवाडे १ व धोकवाडे २ यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर रविवारी (दि. २२ जून) रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन मोठी चिंचेची झाडे अचानक कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. झाडे रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेची माहिती मिळताच समसेविका संजना संदेश पाटील व त्यांचे पती संदेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या मदतकार्यात धोकवाडे येथील ग्रामस्थ गणेश पाटील यांनी विशेष योगदान दिले. झाडे तोडून रस्ता मोकळा करण्याच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच अक्षय आणि इतर वरिष्ठ सहकाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य करत मदतकार्याला गती दिली.

दरम्यान, मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही आणि नागरिकांना सुरक्षितपणे पर्यायी मार्गाचा वापर करता आला.

झाडे हटविण्यासाठी जेसीबीची आवश्यकता भासल्याने जेसीबी मालक विलास म्हात्रे यांनी तातडीने यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्यामुळे आणि सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यात यश आले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या संपूर्ण मदतकार्यात सहभागी झालेल्या ग्रामस्थ, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि सर्व सहकाऱ्यांचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले. संकटाच्या प्रसंगी सर्वांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे मोठी दुर्घटना टळली आणि वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यात यश आले.