वावे येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; पाच वर्षांखालील सर्व बालकांना लसीकरणाचे आवाहन


वावे (प्रतिनिधी) : “माझं गाव आरोग्यसंपन्न गाव” या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. २८ जून २०२६) प्राथमिक आरोग्य केंद्र, वावे येथे पल्स पोलिओ मोहीम २०२६ चा शुभारंभ उत्साहात पार पडला. पंचायत समिती सदस्य मा. श्री. संतोष चंद्रकांत निगडे यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निक्लेशा म्हात्रे, आरोग्य सेविका सौ. अरुणा भगत, आशा सेविका सौ. प्रीतम पाटील तसेच ग्रामस्थ श्री. विशाल आरकशी, श्री. देवदास राऊत, श्री. मंदार मिसाळ, श्री. निलेश तुरे आणि श्री. भूषण गावंड उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पल्स पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन केले. तसेच गावातील एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभाग, आशा सेविका आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

ही मोहीम “माझं गाव आरोग्यसंपन्न गाव” या संकल्पनेला अधिक बळ देणारी ठरत असून नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.