अलिबाग (प्रतिनिधी): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (ता. २८) रायगड जिल्ह्यात उत्साहात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ५९ हजार ८३२ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. यापैकी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १ लाख ४३ हजार ९२४, तर जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत १५ हजार ९०८ बालकांचे लसीकरण करण्यात आले.
जिल्हाभरात २ हजार ३४१ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पुढील काही दिवस आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका घरभेटी देऊन लसीकरण करतील. तसेच स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम मजूर, वीटभट्ट्या, बस व रेल्वे स्थानके तसेच दुर्गम भागांमध्ये विशेष पथकांमार्फतही लसीकरण केले जाणार आहे.
मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच विविध लोकप्रतिनिधी व आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर झाला. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




