जिल्हा रुग्णालयाची दुरवस्था; स्लॅब कोसळल्यानंतर बाथरूममध्येही पाणी नसल्याचा आरोप


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातील एका भागातील स्लॅब कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता बाथरूममध्ये पाणी नसल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या संजना पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संजना पाटील या एका आजारी व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्या असता त्यांना बाथरूममध्ये पाणी नसल्याचे आढळले. याबाबत त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा सुरू केल्याचा दावा त्यांनी केला.
“दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या सर्व निष्काळजीपणासाठी जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) जबाबदार आहेत,” असा आरोप संजना पाटील यांनी केला.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. अशा ठिकाणी सुरक्षितता, स्वच्छता आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा अखंडित उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार समोर येणाऱ्या घटनांमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र, रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना करून रुग्णालयातील सुविधांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.