अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची आढावा बैठक उपाध्यक्ष तथा सभापती मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.२) पार पडली. बैठकीत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी एनक्यूएएस अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र लोहप आणि प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत १०० टक्के आयुष्मान कार्ड तयार करण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक तसेच आरोग्य कर्मचारी तालुका कर्जत व पनवेल यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उपाध्यक्ष तथा सभापती मधुकर पाटील यांनी “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्व कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने आपापली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, जेणेकरून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व संपन्न होईल, असे आवाहन केले. तसेच आरोग्य विभागाच्या सर्व उपक्रमांसाठी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण यांनी क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत “टीबी रुग्णांसाठी निक्षय मित्र व्हा” या उपक्रमात प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या तालुक्यातील किमान एक क्षयरोग रुग्ण दत्तक घेऊन त्याला आवश्यक पोषण व सामाजिक आधार देण्याचे आवाहन केले.
या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य निलेश घाटवळ, सदस्य कृष्णा पारंगे, मन्सूर ताज, दिशा जाधव, ॲड. अविनाश ठाकूर, शर्मिला बोडके, नेहा पारंगे, उषा ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. दामोदर मोरे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्राचीन नेहुलकर तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यांचा झाला सन्मान:
माझं गाव आरोग्य संपन्न गावअभियान अंतर्गत आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत 100 टक्के कार्ड निर्मिती केल्याबद्दल कर्जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव व पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे यांना सन्मानित करण्यात आले





