रायगड-रत्नागिरीतील पूरस्थितीचा आदिती तटकरे यांनी घेतला आढावा


मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. भारतीय हवामान विभागाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्याने पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी महाड येथे एनडीआरएफची तुकडी सज्ज ठेवण्यात आली असून, सुधागड व रोहा परिसरासाठी १४५ अतिरिक्त जवानांची मागणी करण्यात आली आहे. तसेच कर्जत, खोपोली येथील सेवाभावी संस्थांशी प्रशासनाचा सातत्याने संपर्क असून, गरजेनुसार त्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

पूरस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातून सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सतर्क असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.