रायगड (प्रतिनिधी) :रायगड जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त झालेल्या कणे (ता. पेण) परिसराची जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी पूरग्रस्त नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, नुकसानीची माहिती आणि तातडीच्या गरजा जाणून घेतल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदत व बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
पूरग्रस्त भागातील नागरिकांनीही प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष गावात येऊन परिस्थितीची पाहणी करत असल्याने ग्रामस्थांना मोठा मानसिक आधार आणि दिलासा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा प्रशासन, रायगड पोलीस, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास यावेळी प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.






