अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात महिला संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यांकडे पोलिस प्रशासन अत्यंत गांभीर्याने पाहत असून, अशा प्रत्येक प्रकरणाचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी रायगड पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात असून, महिला अत्याचार, छेडछाड, लैंगिक अत्याचार तसेच इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये तक्रार दाखल होताच तपास पथक त्वरित कार्यरत केले जाते. पुरावे संकलित करून आरोपींना अल्पावधीत अटक करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, अशा प्रकरणांमध्ये केवळ आरोपींना अटक करून न थांबता, तपास जलद गतीने पूर्ण करून न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडून पीडित महिलांना लवकर न्याय मिळावा, हा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अत्याचार किंवा छळाच्या घटनांची भीती न बाळगता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले. महिला सुरक्षेसाठी रायगड पोलिस कटिबद्ध असून, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Home ताज्या बातम्या महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; गुन्ह्यांचा तातडीने तपास करून आरोपपत्र दाखल : पोलिस...






