रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास मदत कक्ष सुरू; ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा


अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामीण भागातून उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य विभाग, डॉक्टर किंवा उपचार प्रक्रिया याबाबत अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयाबाहेर शिवसेनेच्या वतीने २४ तास कार्यरत राहणारा मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन, विभागांची माहिती तसेच विविध शासकीय आरोग्य सेवांबाबत सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयात आल्यानंतर कोणत्या विभागात जायचे, कोणत्या डॉक्टरांना भेटायचे किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करायची, याबाबत संभ्रम निर्माण होतो. ही अडचण दूर करण्यासाठी मदत कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात आला असून, याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी अलिबाग मतदारसंघातील विकासकामांचाही आढावा घेतला. अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यातून स्व. नमिता नाईक क्रीडासंकुल, अत्याधुनिक मत्स्यालय, पाणीपुरवठा योजना तसेच भूमिगत गटार योजनेसारखी महत्त्वाची विकासकामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना आमदार दळवी यांनी आगामी काळात अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात सकारात्मक राजकीय परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केलेल्या आवाहनाला समर्थन देत शिवसैनिकांनी आपल्या वाहनांवर शिवसेनेचा अधिकृत लोगो लावून पक्षावरील निष्ठा आणि ओळख जपावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच रुग्णालय परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मदत कक्षामुळे रुग्णांना तत्काळ मार्गदर्शन मिळणार असून, आरोग्य सेवांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.