जिल्ह्यातील विविध विठ्रल मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी; ग्रामीण भागातून पालखी सोहळे उत्साहात


अलिबाग (प्रतिनिधी): आषाढी एकादशीनिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये शनिवारी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली. “विठ्ठल-विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या गजरात जिल्हाभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातून पालखी सोहळे आणि दिंड्या उत्साहात मंदिरांमध्ये दाखल झाल्या, तर अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनीही दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली.
अलिबागजवळील वरसोली येथील प्राचीन आंग्रेकालीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विविध भजन मंडळांनी भजन सेवा सादर केली, तर काही ठिकाणी कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले. मंदिर व्यवस्थापनाने दर्शनासाठी तात्पुरते शेड, प्रसाद आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था केली होती.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खालापूर तालुक्यातील साजगाव येथील विठ्ठल मंदिरातही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दर्शन घेतले. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रायगड जिल्ह्यातून एसटी महामंडळाने जादा बसांची व्यवस्था केली असून, परतीच्या प्रवासासाठीही अतिरिक्त बस सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.