
अलिबाग (प्रतिनिधी): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने दक्षिण रायगडात आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषी माऊली सोहळ्या’ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे, शेती साहित्य आणि कृषी उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. महिला सक्षमीकरणाला चालना देत त्यांना आधुनिक, आत्मनिर्भर आणि शाश्वत शेतीकडे प्रोत्साहित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची दक्षिण रायगडात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाण्यांचा वापर, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलीमा पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, भाजप दक्षिण रायगडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा ‘कृषी माऊली सोहळा’च्या जिल्हा प्रभारी श्रेयाताई कुंटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. महिला शेतकऱ्यांच्या हातात शेतीसाठी आवश्यक साहित्य देण्याबरोबरच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आत्मनिर्भर बनविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महिला सक्षमीकरण, कृषी विकास आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थित महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.






