‘फडणवीस दिल्लीत गेल्यास शिंदे पुन्हा मुख्यमंत्री…’- भरतशेठ गोगावले


सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

रायगड (प्रतिनिधी): शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य करत नव्या राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात केंद्राच्या राजकारणासाठी दिल्लीत गेल्यास, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळावी, अशी आपली तीव्र इच्छा असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. गोगावले म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मी देवाकडेही साकडं घातलं आहे. माझी ती मनापासूनची इच्छा आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील भविष्यातील नेतृत्वाबाबत नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकारणातील सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात. योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. या वक्तव्यामुळे त्यांच्या विधानामागे काही राजकीय संकेत आहेत का, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.