महावितरण कार्यालयाला शेकापचा घेराव; स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलांवर जाब


अलिबाग (प्रतिनिधी) : स्मार्ट मीटरमुळे वीजबिले तिप्पट येत असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाने चेंढरे येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, वाढीव वीजबिले रद्द करावीत आणि पूर्वीचे इलेक्ट्रॉनिक मीटर पुन्हा सुरू करावेत, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शेकाप महिला आघाडीच्या ॲड. मानसी म्हात्रे यांनी ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप केला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर भरमसाठ वीजबिले, स्थिर आकारणी व इतर करांमुळे ग्राहकांवर आर्थिक भार वाढल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा इशाराही देण्यात आला.

यावेळी तालुका चिटणीस सुरेश घरत, माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, प्रमोद घासे, नागेश कुलकर्णी, नगरसेवक अनिल चोपडा, जमाल सय्यद, माजी नगरसेविका संजना कीर यांच्यासह शेकापचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी स्मार्ट मीटर प्रकल्प हा सर्वसामान्यांच्या हिताचा नसून कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी राबविला जात असल्याचा आरोप करत, ग्राहकांवर सक्ती थांबवून तक्रारींची चौकशी करण्याची मागणी केली.