अलिबाग (प्रतिनिधी) : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रायगड पोलीस दलाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत कठोर इशारा दिला आहे. पैसे कमावण्याच्या आमिषाला किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडून नागरिकांनी आपली बँक खाती, एटीएम कार्ड, पासबुक, धनादेश पुस्तिका, ओळखपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, छायाचित्रे तसेच सिमकार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगार अनेकदा आर्थिक लाभाचे आमिष दाखवून किंवा कमिशन देण्याचे आश्वासन देत नागरिकांकडून बँक खाती व सिमकार्ड मिळवतात. त्यानंतर या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणूक, मनी लॉन्डरिंग, डिजिटल अटक, गुंतवणूक फसवणूक आणि इतर सायबर गुन्ह्यांसाठी केला जातो. अशा गुन्ह्यांमध्ये संबंधित खातेदारालाही संशयित मानले जाऊ शकते.
रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्याचा किंवा सिमकार्डचा वापर सायबर गुन्ह्यात झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित खातेदारालाही थेट गुन्ह्यातील सहभागी मानून त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता स्वतःची वैयक्तिक कागदपत्रे आणि बँकिंग माहिती सुरक्षित ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायबर फसवणुकीबाबत कोणतीही शंका आल्यास किंवा फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही रायगड पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे.
Home ताज्या बातम्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांचा इशारा; बँक खाते, सिमकार्ड अनोळखींकडे देऊ...









