
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्यात आल्या. जिल्ह्यातील सुमारे १,४०० पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल १,२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, एवढा मोठा निधी खर्च होऊनही अनेक गावांमध्ये अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी जलजीवन योजना अपयशी ठरण्यास पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या चुका कारणीभूत असल्याचा दावा केला. नियोजनातील त्रुटी, कामांच्या अंमलबजावणीत झालेला विलंब तसेच देखरेखीचा अभाव यामुळे अनेक ठिकाणी योजना अपेक्षित उद्दिष्ट गाठू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.
जलजीवन मिशनसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असूनही अनेक गावांतील नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निधीचा नेमका वापर, कामांची गुणवत्ता आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत चौकशीची मागणीही होत आहे.
योजनेतील त्रुटी दूर करून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





