जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण


अलिबाग (प्रतिनिधी): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या वतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली विधी स्वयंसेवक (PLV) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात डेप्युटी चीफ LADCS ॲड. मनीषा नागावकर यांनी पीसी अँड पीएनडीटी कायद्याविषयी मार्गदर्शन करत स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. विनायक पाटील यांनी गर्भलिंग निदानासारख्या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कायदेशीर कारवाईची माहिती दिली. PLV सुशील सायकर यांनी विधी स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या, तर शैलेश कोंडस्कर यांनी क्षेत्रातील अनुभव सांगून समाजसेवेची प्रेरणा दिली.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती कंटे यांनी गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी तसेच शासनाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमास ॲड. अनंत डी. पाटील, अधिकारी, पॅनेल वकील, विधी स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या स्वयंसेवकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. तनुष्का पेडणेकर यांनी केले.