किहिम येथे लायन्स क्लबच्या बैठकीत अमितदादा नाईक यांचा सत्कार; सदस्यांना केले मार्गदर्शन


अलिबाग (प्रतिनिधी): किहिम (अलिबाग) येथे आज लायन्स क्लबच्या सदस्यांची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस रायगड जिल्हा परिषद सदस्य, मुख्य प्रतोद तथा लायन्स क्लबचे सदस्य मा. श्री. अमितदादा नाईक प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी लायन्स क्लबच्या सदस्यांना सामाजिक बांधिलकी, सेवाभावी उपक्रम आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी होऊन जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल लायन्स क्लबच्या वतीने अमितदादा नाईक यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. उपस्थित सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व विकासकामांसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतात अमितदादा नाईक यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंना मदत या क्षेत्रांत लायन्स क्लबने सातत्याने कार्य करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.