पेण व सुधागडमध्ये आदिवासी समाजासाठी सभागृह उभारण्याची मागणी


आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट; मागणीला सकारात्मक प्रतिसाद

रायगड (प्रतिनिधी) : पेण व सुधागड तालुक्यातील आदिवासी समाजासाठी स्वतंत्र समाज सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे केली.

यासंदर्भात आज मुंबई येथील लोहगड बंगल्यावर आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी कोकण विभाग प्रसिद्ध प्रमुख सतीश धारप,जिल्हा सरचिटणीस ॲड महेश मोहीते जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, चंद्रकांत वारकुडा तसेच गोविंद लेंडी यांनी पेण व सुधागड तालुक्यात आदिवासी समाजासाठी स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता असल्याचे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

पेण तालुक्यासह सुधागड परिसरात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम, विविध बैठका, मार्गदर्शन शिबिरे तसेच समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यासाठी आदिवासी समाजाला स्वतंत्र व सुसज्ज सभागृहाची आवश्यकता आहे. सध्या अशा कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून घ्यावी लागत असल्याने समाजासाठी कायमस्वरूपी सभागृह उभारल्यास मोठी सुविधा निर्माण होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

आदिवासी समाजाच्या मागणीची दखल घेत मंत्री डॉ. अशोक उईके यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. सभागृह उभारणीच्या मागणीसाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

“आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू. समाजाच्या मूलभूत गरजा आणि विकासाच्या प्रश्नांना प्राधान्याने पुढे नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.