ग्रामपंचायतीवर संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा; महिलांचा हंडे घेऊन सहभाग
अलिबाग (प्रतिनिधी): ऐन पावसाळ्यातही अलिबाग शहरालगतच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घरातील नळ कोरडे पडल्याने त्रस्त नागरिकांनी पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज थेट ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हातात हंडे घेऊन प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
चेंढरे परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नवीन घरे, इमारती आणि वसाहतींची संख्या वाढत असताना त्याच प्रमाणात पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. लोकसंख्या वाढत असताना उपलब्ध पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येत असून, परिणामी नागरिकांना नियमित पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
कधी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर कधी अनेक दिवस नळाला पाणीच येत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन घराबाहेर पडण्याची वेळ आल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.
‘पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. पावसाळ्यातही जर पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल, तर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने कधी पाहणार?’ असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. चेंढरे गावाचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज यांचा विचार करून कायमस्वरूपी नियोजन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी पाणीपुरवठा यंत्रणेची सखोल पाहणी करून नेमकी अडचण कुठे आहे, याचा शोध घ्यावा. तसेच पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
चेंढरे परिसरातील वाढते नागरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. दरम्यान, ऐन पावसाळ्यात नागरिकांना हंडे घेऊन रस्त्यावर उतरावे लागल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नावर कोणती तातडीची पावले उचलणार, याकडे चेंढरे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






