अलिबाग (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी अलिबाग शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि देशभक्तीच्या घोषणांनी अलिबाग शहरातील वातावरण भारावून गेले.
रॅलीदरम्यान देशभक्तीपर तसेच स्फूर्तिदायी गीतांच्या धूनांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. प्रत्येकाच्या हातात तिरंगा असल्याने संपूर्ण परिसर तिरंगामय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला.
रॅलीमुळे अलिबाग शहरात काही काळ देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








