गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, लेझर लाईट, स्नो-केमिकल स्प्रेवर रायगडमध्ये बंदी


जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा प्रतिबंधात्मक आदेश; आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
अलिबाग ( प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका शांततेत व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पार पडाव्यात, तसेच नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे/डॉल्बी साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईट्स, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांच्या वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत.
डिजे-डॉल्बी लेझर लाईट वापरास प्रतिबंधाबाबत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात गणेशोत्सव काळात मिरवणुकांमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीम, स्नो स्प्रे, हिट स्प्रे तसेच लेझर बीम लाईट्सचा वापर केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटामुळे काही नागरिकांना बहिरेपणाच्या समस्या तसेच काहींना हृदयविकाराचे झटके आल्याच्या घटना निदर्शनास आल्याचे आदेशात नमूद आहे.
तसेच, विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईटमुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याचे प्रकार घडल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. लेझर बीम लाईटमुळे नागरिकांचे तसेच मिरवणूक बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
१९ व २५ सप्टेंबरला विशेष निर्बंध
रायगड जिल्ह्यात १९ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सवाचा सहावा दिवस आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी श्री गणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
डिजे-डॉल्बी लेझर लाईट वापरास प्रतिबंधाबाबत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यात, पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डीजे/डॉल्बी साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईट्स, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांच्या वापरास प्रतिबंध लागू केला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई
या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईट्स, स्नो स्प्रे किंवा केमिकल स्प्रेचा वापर करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळे किंवा संचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
डिजे-डॉल्बी लेझर लाईट वापरास प्रतिबंधाबाबत.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटच्या संभाव्य दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गणेश मंडळांनी तसेच मिरवणूक आयोजकांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून शांतता, सुरक्षितता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.