प्रामाणिक कर्तव्याला सलाम..! सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग पोलिसांनी केली सुखरूप परत


खारपाडा येथे सापडली मौल्यवान दागिने असलेली बॅग; पोलीस हवालदार सतीश पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

अलिबाग (प्रतिनिधी): प्रामाणिकपणे बजावलेले कर्तव्य आणि माणुसकीचा प्रत्यय देणारी घटना १६ सप्टेंबर रोजी मौजे खारपाडा येथे घडली. प्रवासादरम्यान सोन्याचे मौल्यवान दागिने असलेली बॅग विसरलेल्या कुटुंबाला पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचे साहित्य सुखरूप परत मिळाले. कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार सतीश पाटील यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
धारावी, मुंबई येथून सुमित पाथरे हे आपल्या कुटुंबासोबत चिपळूणकडे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान मौजे खारपाडा येथे त्यांची प्रवासी बॅग राहून गेली. या बॅगेमध्ये मौल्यवान सोन्याचे दागिने तसेच इतर साहित्य होते. काही अंतर पुढे गेल्यानंतर बॅग सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कुटुंबीयांची मोठी चिंता वाढली.
दरम्यान, कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार सतीश पाटील यांना ही बॅग आढळून आली. बॅगमध्ये मौल्यवान वस्तू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सदर बॅग सुरक्षितपणे दादर सागरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर सुमित पाथरे व त्यांच्या कुटुंबीयांनी परत येऊन पोलिसांशी संपर्क साधला. बॅग व त्यामधील दागिन्यांची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी आवश्यक खातरजमा करून मौल्यवान दागिन्यांसह बॅग पाथरे कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.
मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर त्या प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन सुरक्षितपणे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचविणाऱ्या पोलीस हवालदार सतीश पाटील यांच्या कार्याचे पाथरे कुटुंबीयांनी आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे पोलिस दलाची विश्वासार्हता अधोरेखित झाली असून, “प्रामाणिक कर्तव्याला सलाम” अशी भावना या घटनेतून व्यक्त होत आहे.