शासनाचा पैसा खर्च होऊनही रुग्णांच्या ताटात निकृष्ट भोजन; पाहणीसाठी चांगले जेवण, प्रत्यक्षात करपलेल्या चपात्या आणि पाणचट भाजी
अलिबाग (अमुलकुमार जैन): शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना औषधोपचारांसोबत सकस आणि स्वच्छ भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून भोजन व्यवस्था केली जाते. या व्यवस्थेवर शासनाचा पैसा खर्च होत असतानाही अलिबाग जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या ताटात निकृष्ट दर्जाचे भोजन पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या भोजन व्यवस्थेचा ठेका नेमका कोणाच्या नियंत्रणाखाली आहे आणि ठेकेदाराच्या कामावर देखरेख कोण करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णांसाठी भोजन तयार करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असून, या कामापोटी त्याला शासनाकडून बिल अदा केले जाते. भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी तयार केलेल्या जेवणाचा नमुना जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाहणी आणि अभिप्रायासाठी पाठविला जातो. मात्र, या पाहणीसाठी पाठविण्यात येणारे भोजन स्वच्छ आणि नीटनेटके असते, तर प्रत्यक्ष रुग्णांना करपलेल्या चपात्या, पाणचट वरण आणि पाण्यासारखी भाजी दिली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पाहणीसाठी वेगळे आणि रुग्णांसाठी वेगळे भोजन तयार केले जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
भोजन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाकघरातील स्वच्छतेबाबतही गंभीर तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी रुग्णांसाठी भोजन बनविले जाते, तेथे आवश्यक स्वच्छता पाळली जात नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकारांची संबंधित विभागाने तपासणी करणे गरजेचे आहे.
दुसरीकडे, भोजन व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी नियुक्त असलेल्या दोन महिला अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या वर्तनाबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. भोजनाच्या दर्जाबाबत किंवा व्यवस्थेबाबत विचारणा केली असता मोठ्या आवाजात बोलणे आणि अरेरावीची भाषा वापरणे असे प्रकार होत असल्याची तक्रार आहे. रुग्णांना भोजन पुरविणे ही कोणाची वैयक्तिक मेहरबानी नसून शासनाच्या निधीतून राबविली जाणारी जबाबदारी आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला मोबदला दिला जातो. त्यामुळे रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेणे आणि त्यांना दर्जेदार भोजन मिळते की नाही, याची खातरजमा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी केवळ पाहणीसाठी पाठविण्यात येणाऱ्या भोजनावर समाधान न मानता पाकघराची अचानक तपासणी करावी. रुग्णांच्या ताटातील भोजनाचे नमुने घेऊन त्यांची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करावी. ठेकेदाराच्या कामकाजाची, स्वच्छतेची आणि गॅस सिलिंडर वापराच्या नियमांची चौकशी करावी. तसेच देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
शासनाचा पैसा खर्च करूनही रुग्णांना निकृष्ट भोजन मिळत असेल, तर या व्यवस्थेचा उपयोग नेमका कोणासाठी? हा प्रश्न आता जिल्हा रुग्णालय प्रशासनाला उत्तर द्यावे लागणार आहे.








