रायगडमध्ये महायुती धर्मावरून भाजपची नाराजी; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ॲड. महेश मोहिते यांनी घेतली तातडीची भेट


शिवसेना शिंदे गटाकडून भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश घडवून आणण्यावर आक्षेप; युतीधर्म किती काळ पाळायचा, असा उपस्थित केला सवाल

रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रायगड निवासस्थानी तातडीची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील भाजप संघटनेची सद्यस्थिती, महायुतीमधील पक्षांचे परस्पर संबंध आणि स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्षांना देत संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली.

रायगड जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत. मात्र, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा मुद्दा ॲड. मोहिते यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे भाजपच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघांवरही शिवसेना शिंदे गटाकडून लक्ष केंद्रित केले जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

एकीकडे भाजप महायुतीचा धर्म पाळत असताना दुसरीकडे मित्रपक्षाकडून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश दिले जात असतील, तर भाजपने यापुढे युतीधर्म किती काळ आणि कितपत पाळायचा, असा महत्त्वपूर्ण सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे जिल्ह्यातील भाजप संघटनेसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील राजकीय परिणामांकडेही त्यांनी प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले.

या विषयावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा विषय गंभीर असल्याचे मान्य केले. यापुढे या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असे स्पष्ट करत या संपूर्ण विषयावर वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीत ॲड. महेश मोहिते यांनी रायगड जिल्ह्यातील भाजपची भूमिका आणि महायुतीतील सद्यस्थिती प्रदेशाध्यक्षांसमोर स्पष्टपणे मांडली. या चर्चेमुळे रायगड जिल्ह्यातील महायुतीमधील अंतर्गत राजकीय समीकरणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रदेश नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.