अलिबागमध्ये ‘बिर्ला ओपस पेंट गॅलरी’चा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न!


सीईओ सचिन सहाय यांची विशेष उपस्थिती; ॲड. संदीप पालकर आणि नगरसेविका ॲड. श्वेता पालकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील ग्राहकांसाठी रंगांच्या आकर्षक दुनियेचे नवे दालन खुले झाले असून, ‘बिर्ला ओपस पेंट गॅलरी’चा भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या नवीन गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्याला बिर्ला ओपस पेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. सचिन सहाय यांची विशेष उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाला अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते ॲड. संदीप पालकर आणि नगरसेविका ॲड. श्वेता संदीप पालकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नवीन व्यावसायिक उपक्रमाचे स्वागत करून या गॅलरीच्या माध्यमातून अलिबागच्या बाजारपेठेत ग्राहकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.

या प्रॉपर्टीचे मालक श्री. वैभव नाईक यांनी अलिबागमध्ये बिर्ला ओपस पेंट्सची आकर्षक आणि अद्ययावत गॅलरी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी वैभव नाईक यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच बिर्ला ओपस पेंट्सच्या संपूर्ण टीमला नवीन व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या गॅलरीच्या माध्यमातून अलिबाग शहरासह परिसरातील ग्राहकांना घर, कार्यालय तसेच विविध वास्तूंच्या रंगकामासाठी रंगांचे नवनवीन पर्याय, आकर्षक रंगसंगती आणि दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार रंगांची निवड करता येणार असून, योग्य मार्गदर्शन आणि सेवा मिळण्यासही मदत होणार आहे.

अलिबागच्या वाढत्या व्यावसायिक विस्तारात या नवीन दालनाची भर पडली असून, स्थानिक ग्राहकांसाठी रंगांच्या क्षेत्रातील एक नवा पर्याय उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.