संत निरंकारी मिशनतर्फे भिलजी येथे २९ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन


मानवतेच्या सेवेसाठी रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन

अलिबाग (प्रतिनिधी) : मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखेच्या वतीने अलिबाग तालुक्यातील भिलजी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, शाखा भिलजी यांच्या पुढाकाराने रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

भिलजी येथील संत निरंकारी भवन येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडणार आहे. या शिबिरामध्ये रक्तसंकलनाचे काम जिल्हा शासकीय रक्तपेढी, अलिबाग-रायगड यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

संत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरांची सामाजिक चळवळ २३ ऑक्टोबर १९८६ पासून सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर दरवर्षी २४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘मानव एकता दिवसापासून’ संपूर्ण विश्वात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मानवतेची सेवा, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान देण्याचे महान कार्य आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच समाजामध्ये रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, या हेतूने संत निरंकारी मिशनच्या वतीने अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून समाजात मानवतावादी दृष्टिकोन आणि सेवाभाव वृद्धिंगत होत आहे.

या रक्तदान शिबिरात अलिबाग तालुक्यातील नागरिक, तरुण वर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संत निरंकारी मंडळाच्या भिलजी शाखेचे मुखी सुरेश गावंड यांनी केले आहे.

‘रक्तदान हेच जीवनदान’ हा मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्यासाठी भिलजी येथे आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.