अलिबाग(प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र बोलीपंचतन अंतर्गत बोर्लीपंचतन गावामधील कोंडेपंचतन रोड, वांजळे रोड, चिंचबादेवी रोड, साईनगर, कुंभारआळी या परिसरात अतिसाराची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र बोलींपंचतन येथील आरोग्य पथकामार्फत तत्काळ सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये एकूण 1,142 घरांमध्ये 3,130 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 81 रुग्ण व आरोग्य पथकामार्फत घरोघरी केलेल्या सर्वेक्षणामध्ये 227 असे एकूण 308 रुग्णसंख्या झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व अतिसार बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले आहेत.
बोर्लीपंचतन गावामधील कोंडेपंचतन रोड, वांजळे रोड, चिंचबादेवी रोड, साईनगर, कुंभारआळी या परिसरात काही नागरिकांना जुलाब, पोटात दुखणे अशी अतिसराची लक्षणे आढळून आली आहेत. त्या पाश्र्वभूमिवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने तातडीने या भागात घरोघरी जाउन सर्वेक्षण केले. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व अतिसार बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती बरी आहे. एकही रुग्ण अॅडमीट झालेला नसून एकही रुग्ण गंभीर नाही. अद्यापर्यंत कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागामार्फत ग्रामपंचायतच्या सहकार्याने गावामध्ये लोकांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत पाण्याच्या स्त्रोतांच्या सर्व टाक्यांची स्वच्छता करण्यात आली असून दररोज क्लोरीनेशन करुन सदरचे पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना पाण्यामध्ये टाकण्याकरिता मेडिक्लोर वाटप करण्यात आले आहे. सर्वेक्षणामध्ये कार्यक्षेत्रात गुरुवार (ता.5)च्या एकही रुग्ण आढळून आलेला नसून बाह्यरुग्ण विभागामध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकामार्फत दैनंदिन सर्वेक्षण सुरू आहे.
गावातील पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा अलिबाग येथे पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत अतिसाराची साथ आटोक्यात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता जुलाब अतिसार व पोटात दुखणे अशी लक्षणे आढळून आल्यास उपचारासाठी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे. स्वच्छतेचे पालन करावे असे आवाहन राजिप आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या बोर्लीपंचतनमध्ये अतिसाराच्या पाश्र्वभूमिवर घरोघरी सर्वेक्षण लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन









