रायगड माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या कारभाराची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा; माजी आमदार पंडित पाटील यांचा घणाघात
उपसंचालकांकडे प्रत्यक्ष तक्रार करूनही कारवाई नाही; मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी
अलिबाग (प्रतिनिधी) : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रोहा येथे अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिकपदी नियुक्त झालेल्या श्रीमती स्नेहल गजानन वाघ यांना गेल्या तीन वर्षांपासून वेतनाविना काम करावे लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे आणि कथित मनमानी कारभारामुळे एका गरजू कुटुंबातील तरुणीवर आर्थिक संकट ओढवले असून, तिच्या न्याय्य हक्कांपासून तिला वंचित ठेवले जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणाला केवळ एका कर्मचाऱ्याच्या वेतनाचा प्रश्न न मानता रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या कार्यकाळात देण्यात आलेल्या नियुक्ती मान्यता, शालार्थ प्रणालीतील नोंदी आणि संशयास्पद व्यवहारांची नाशिकच्या धर्तीवर स्वतंत्र विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सखोल चौकशी करावी. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव; मान्यता मिळूनही वेतनाचा प्रश्न कायम
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलमध्ये कार्यरत असताना कर्मचारी कै. गजानन कमळाकर वाघ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून कन्या श्रीमती स्नेहल गजानन वाघ यांना अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिकपदी नियुक्त करण्यात आले. या नियुक्तीच्या मान्यतेसाठी संस्थेने ३ नोव्हेंबर २०२३ रोजी रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता.
त्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी नियुक्तीला मान्यता देणारा आदेश जारी केला. पुढे ६ मार्च २०२५ रोजी श्रीमती वाघ यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविला. मात्र, नियुक्तीला मान्यता मिळाल्यानंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पंडित पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप
या प्रकरणात नोकरी आणि नियुक्तीची मान्यता मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिक्षण विभागातील संबंधित व्यक्तींनी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप पंडित पाटील यांनी केला आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणीला वेतन मिळण्याची आश्वासने देत तीन वर्षांपासून कामावर ठेवण्यात आले; मात्र प्रत्यक्षात तिला कोणतेही वेतन किंवा मानधन मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे संबंधित तरुणीची आर्थिक कोंडी झाली असून, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
उपसंचालकांकडे तक्रार करूनही कारवाई शून्य
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन विभागीय शिक्षण उपसंचालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला होता. त्यांच्याकडे तक्रारही सादर करण्यात आली होती. त्यानंतर उपसंचालक कार्यालयाने नियुक्तीच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी आणि नियमांच्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून खुलासा मागविला होता. मात्र, हा खुलासा सुमारे वर्षभर प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे.
एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी संपर्क साधला असता माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे हे लोकप्रतिनिधींचे दूरध्वनी स्वीकारत नसल्याचा तसेच महत्त्वाच्या बैठकांनाही उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन
रायगड जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे अनेक गैरप्रकार घडत असल्याचा दावा पंडित पाटील यांनी केला आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील प्रकरणांपेक्षाही रायगडमधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्र्यांकडे सविस्तर निवेदन पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.
एसआयटी चौकशी करून पीडितेला न्याय द्या
माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्या कार्यकाळातील सर्व नियुक्ती मान्यता, शालार्थ प्रणालीतील नोंदी आणि संशयास्पद व्यवहारांची स्वतंत्र एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे. तसेच श्रीमती स्नेहल वाघ यांना शासनाच्या नियमानुसार ऑफलाइन प्रक्रियेद्वारे वेतनाचा मार्ग उपलब्ध करून देत त्यांचे थकीत वेतन मिळवून द्यावे, अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.
एका दिवंगत कर्मचाऱ्याच्या वारसदाराला अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतरही वेतनासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. शिक्षण विभागातील कथित अनियमितता आणि प्रशासकीय दिरंगाईची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित तरुणीला तातडीने न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका माजी आमदार पंडित पाटील यांनी मांडली आहे.








