रायगड जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप समजून घेण्याची संधी; विषयतज्ज्ञांकडून मिळणार मार्गदर्शन
अलिबाग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) या भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात विविध शाखांमधील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप, तयारीची दिशा आणि आवश्यक बाबींची माहिती मिळावी, या उद्देशाने आरसीएफच्या थळ युनिटतर्फे बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रमाचे (Pre Recruitment Awareness Programme) आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता अलिबाग येथील आरसीएफ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील समृद्धी सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.
आरसीएफमधील व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसंदर्भातील जाहिरात विविध वृत्तपत्रांसह आरसीएफच्या अधिकृत www.rcfltd.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीला प्रतिसाद देत ऑनलाइन अर्ज केलेल्या रायगड जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात अनारक्षित (UR), अनुसूचित जाती-जमाती (SC/ST), इतर मागासवर्गीय (OBC-NCL), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) तसेच दिव्यांग (PWBD) प्रवर्गातील पात्र उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची पद्धत, संबंधित विषयांचा अभ्यास आणि परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत आरसीएफमधील संबंधित विषयांचे तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात विशेष तज्ज्ञांकडूनही उमेदवारांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या मार्गदर्शन कार्यक्रमाचे वेळापत्रक संबंधित उमेदवारांना त्यांनी ऑनलाइन अर्ज करताना नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या ई-मेलची तपासणी करून त्यामध्ये नमूद केलेल्या वेळेनुसार कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला येताना संबंधित उमेदवारांनी ई-मेलची प्रत (हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी) सोबत ठेवावी. तसेच ओळखपत्र म्हणून आधार कार्ड (प्राधान्याने), पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायाप्रत सोबत आणावी, असे आवाहन आरसीएफ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील युवकांना भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित कंपनीत रोजगाराची संधी मिळविण्यासाठी या मार्गदर्शन कार्यक्रमाचा निश्चितच लाभ होणार असून, संबंधित सर्व पात्र उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरसीएफ थळ युनिटतर्फे करण्यात आले आहे.









