३० महिलांनी घेतले विविध प्रकारचे कपडे शिवण्याचे प्रशिक्षण; स्वावलंबनाच्या दिशेने महिलांचे महत्त्वपूर्ण पाऊल
अलिबाग (प्रतिनिधी): महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा, या उद्देशाने ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव, उन्नती कम्युनिटी प्रशिक्षण कॅम्प आणि प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवणकाम प्रशिक्षण शिबिराचा समारोप आज उत्साहात करण्यात आला.
या प्रशिक्षण शिबिरांतर्गत गेल्या एक महिन्यापासून वाडगाव गावातील महिलांना विविध प्रकारचे कपडे शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा गावातील ३० महिलांनी लाभ घेतला. प्रशिक्षणादरम्यान महिलांना कपडे शिवण्याच्या विविध पद्धती, शिवणकामातील बारकावे तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात आला.
आजच्या काळात महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता स्वतःच्या कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासोबतच भविष्यात स्वतःचा शिवणकाम व्यवसाय सुरू करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव, उन्नती कम्युनिटी प्रशिक्षण कॅम्प आणि प्रथम फाउंडेशन यांचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयेंद्र भगत यांनी सर्व आयोजक, प्रशिक्षक, सहकार्य करणारे आणि प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांचे आभार मानले.
महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देणारा हा उपक्रम वाडगाव परिसरातील महिलांसाठी स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.









