आमदार महेंद्रशेठ दळवी आणि जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते लोकार्पण
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग येथील नागरिकांचा आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व सुखकर व्हावा, तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने अलिबाग एसटी आगारात तीन नवीन बसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या नवीन बसेसचे लोकार्पण आज अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी आणि शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यानंतर या तिन्ही बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या.
अलिबाग आगारातून दररोज विविध मार्गांवर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच दैनंदिन कामांसाठी एसटी बस ही ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि अधिक चांगल्या वाहतूक सुविधांची गरज लक्षात घेता नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच बससेवेची उपलब्धता वाढण्यास आणि प्रवास अधिक आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अलिबाग एसटी आगाराचे व्यवस्थापक, एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने अलिबाग आगाराच्या सुविधांमध्ये भर पडली असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.









