तळाशेत येथील प्रलंबित रस्त्याच्या कामाची शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामपंचायत तागडवागळे हद्दीतील तळाशेत गावातील प्रलंबित रस्त्याच्या कामाची शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला गती मिळावी आणि ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या दळणवळणाच्या समस्येतून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, या उद्देशाने त्यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
गावातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे ग्रामस्थांना, प्रवाशांना तसेच शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राजाभाई केणी यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रलंबित असलेला हा रस्ता लवकरच पूर्ण करून नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार असून, शेतमालाची वाहतूक करण्यासाठीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यासोबतच दैनंदिन दळणवळणाच्या अडचणीही दूर होण्यास मदत होणार आहे.
जनतेला दिलेला शब्द पाळणे आणि विकासकामे मार्गी लावणे हेच आमचे प्राधान्य आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून विकासकामे पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी शिवसेना सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही राजाभाई केणी यांनी दिली.
विकासकामांचा ध्यास घेऊन दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या भूमिकेतून राजाभाई केणी यांनी केलेल्या या पाहणीमुळे तळाशेत ग्रामस्थांमध्ये रस्त्याचे काम लवकर पूर्ण होण्याबाबत आशा निर्माण झाली आहे.









