अमृत पेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ कार्यक्रम उत्साहात संपन्न


रायगड-अलिबाग(जिमाका) : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील काळभैरवमंदिराच्या पटांगणात (दि.30, ऑक्टोबर दि.31 ऑक्टोबर व दि.01 नोव्हेंबर 2026) या तीन दिवसात महिला उद्योजिकांना व व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारा, स्थानिक कुटुंबवत्सलांना येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त वाजवी दरात दर्जेदार वस्तू, पदार्थ उपलब्ध करून देणारा अमृत पेठ-थेट स्वदेशी बाजार पेठ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन (शुक्रवार दि.30 ऑक्टोबर 2026)  रोजी  चित्रा पाटील व अविनाश कोळी या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व फीत कापून करण्यात आले.

या सोहळ्याला स्थानिकांनी मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिला. एकूण बत्तीस स्टॉल्स या पेठेत होते व तिथे विक्रीसाठी ठेवलेल्या मालातही खूप विविधता होती. खाद्य पदार्थ, पेये, शृंगारसाधने, साड्या, पोषाख, विविध कलापूर्ण भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे इ.स्वतःच्या उत्पादन/निर्मिति क्षमतेतून व तयार गोष्टी तिथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

महिलांचे सक्षमीकरण हाही उद्देश या सोहळ्यामुळे काही प्रमाणात साधला गेला. मणेरी वेस्ट मॅनेजमेंट च्या सौ.ममता मेहता या सुद्धा अमृत पेक्षा उद्घाटनास प्रसंगी उपस्थित होत्या त्यांनी कचरा व्यवस्थापन व महिला सक्षमीकरण अंतर्गत महिला उद्योजक कशा होतील याबाबत मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र शासनाची “अमृत”संस्था आणि रेवदंडा येथील चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या “थेट बाजारपेठ”चं आयोजन केले असल्यामुळे त्या दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी त्या तीनही दिवसात आवर्जून उपस्थित होते. एक चांगला व अनोखा सोहळा बघायला व प्रत्यक्ष खरेदीद्वारे अनुभवायला मिळाला याबद्दल अनेक स्थानिकांनी आनंद व समाधान व्यक्त केले. पुढल्या वर्षीही अधिक जोमात..अधिक उत्साहात पण वेगळ्या निमित्तानं असा “विक्री-खरेदी महोत्सव”आयोजित करावा या मुद्द्यावर उभय संस्थांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये  एकमत होऊन स्थानिकांकडून यंदापेक्षा अधिक उत्साहात प्रतिसाद मिळेल अशी आशा जागवत दि.1 नोव्हेंबरला रात्री या सोहळ्याची सांगता झाली.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शैलेश मराठे व मंगेश ढेबे हे अन्य सहकाऱ्यांसह “अमृत”संस्थेतर्फे  व विश्वास जोशी, दिलीप पटेल इ.अधिकारी सदर पतपेढीतर्फे खूप प्रयत्नशील होते.