अलिबाग (प्रतिनिधी) : भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पाण्याचे महत्त्व, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंवर्धनाची गरज समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा, सारळ यांच्या वतीने ‘जलसंवर्धनातून जलसुरक्षा’ हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तीन टप्प्यांत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यंदा पावसाचा शेवटचा महत्त्वाचा टप्पा अपेक्षेप्रमाणे न झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यातच पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता व्यक्त होत असताना, पुढील पावसाळा जून किंवा जुलैमध्ये कधी सुरू होईल, याची निश्चिती नसल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन, साठवणूक आणि जपून वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर शाळेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जलसंवर्धनाचा संदेश पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सारळ गावातील दाऊदेवी मंदिर परिसरात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक, आजी-पालक, स्थानिक शाळा समितीचे सदस्य, महिला वर्ग, बचत गट आणि महिला मंडळाच्या प्रतिनिधींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्त्व, पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत प्रभावीपणे जनजागृती केली.
तिसऱ्या टप्प्यात रेवस गावातील राम मंदिर परिसरात जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. भविष्यात उपलब्ध पाणी जपून वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि जलसंधारणाच्या उपायांना प्राधान्य देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
लहान वयातील विद्यार्थ्यांनी समाजासमोर पाण्याचे महत्त्व मांडत जनजागृती करण्याचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
‘जलसंवर्धनातून जलसुरक्षा’ हा संदेश केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक नागरिकाच्या कृतीपर्यंत पोहोचावा, तसेच महाराष्ट्र जलसमृद्ध बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करणारा सारळ प्राथमिक शाळेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.








