सहकार व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रीय गौरव; नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित
अलिबाग (प्रतिनिधी) : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग या संस्थेने सहकार व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, संस्थेला प्रतिष्ठेचा ‘Indian Co-operative Summit & Excellence Awards 2026’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील द अशोक हॉटेल, चाणक्यपुरी येथे आयोजित भव्य ‘इंडियन को-ऑपरेटिव्ह समिट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे माजी संचालक माननीय श्री. सतीश मराठे सर व श्री. ज्योतिंद्र मेहता अध्यक्ष, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ (NUCFDC), श्री. लक्ष्मी दास अध्यक्ष, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज (NAFCUB), श्री. गौतम ठाकूर सदस्य, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमनविषयक सल्लागार गटाचे (AGR) व माजी अध्यक्ष सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक , श्री. विद्याधर व्ही. अनास्कर प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक , ‘इंडियन कोऑपरेटिव्ह’चे संपादक अजय झा ,श्री. रोहित गुप्ता सहसंपादक, मान्यवरांच्या शुभहस्ते संस्थेच्या प्रतिनिधींनी हा सन्मान स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. गिरीश तुळपुळे, अध्यक्ष श्री. नंदकुमार चाळके, संचालक श्री. सतीशचंद्र पाटील, संचालक श्री. प्रवीण जैन, तज्ञ संचालक श्री. हिमांशू सहानी, उपमहाव्यवस्थापक श्री. रंजन पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी श्री. देवेंद्र कारुळकर उपस्थित होते.
या भव्य राष्ट्रीय सोहळ्यात देशभरातील सहकारी क्षेत्रातील विविध संस्थांना ७० हून अधिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, हे पुरस्कार केवळ मोठ्या आणि नामांकित सहकारी संस्थांपुरते मर्यादित न ठेवता लहान नागरी सहकारी बँका (Urban Cooperative Banks), राज्य सहकारी बँका तसेच विविध नागरी सहकारी पतसंस्थांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले. या सोहळ्याला देशाच्या विविध भागांतील सहकारी बँका, पतसंस्था आणि अन्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या राष्ट्रीय सोहळ्याला सहकार क्षेत्रातील व्यापक प्रतिनिधित्व लाभले.
सन १९९२ पासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कमळ नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांच्या आधारे आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, डिजिटल बँकिंगचा स्वीकार, गुणवत्तापूर्ण सेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संस्थेच्या या यशामध्ये संस्थापक अध्यक्ष व अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेवर विश्वास ठेवणारे सभासद यांचे मोलाचे योगदान आहे. प्राप्त झालेला हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे संस्थेच्या आजवरच्या कार्याची पावती असून, भविष्यात अधिक जोमाने सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या राष्ट्रीय सन्मानामुळे कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, रायगड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब ठरली आहे.









