वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड; नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन, प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.
अलिबाग(प्रतिनिधी) : राजकारण आणि सार्वजनिक जीवनात काम करताना विकासकामांसोबतच नागरिकांचे आरोग्य, सामाजिक प्रश्न आणि लोककल्याण यांनाही महत्त्व देणे आवश्यक असते. वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसेवेचा हा उपक्रम राबवून प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. शुभेच्छांच्या माध्यमातून व्यक्त होणारे प्रेम समाजोपयोगी उपक्रमातून परत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच सकारात्मक आणि अनुकरणीय ठरला.
अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आयोजित या शिबिरातून मोफत नेत्र तपासणी, मधुमेह, हिमोग्लोबिन आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करत प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जलसापाडा, कस्टम ऑफिससमोर, अलिबाग येथे शनिवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. लायन्स क्लब अलिबाग यांच्या सौजन्याने आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मधुमेह, डोळ्यांचे विकार, रक्तातील हिमोग्लोबिनचे असंतुलन आणि अन्य आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसतात. अनेकदा आर्थिक अडचणी किंवा वेळेअभावी नागरिक नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याविषयी जागरूक करण्याचा आणि वेळेत तपासणीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या शिबिरासाठी लायन्स क्लबच्यावतीने प्रदीप नाईक, अनिल म्हात्रे, प्रवीण सारनाईक, भगवान मालपाणी आणि महेंद्र पाटील तसेच, गौतम पाटील, जनार्दन वरसोलकर, समीर ठाकूर, साक्षी पाटील, अश्विनी ठोसर, नीलम हजारे, निवेदिता वाघमारे, नागेश कुलकर्णी यांच्यासह अन्न नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अदिती कीर, डॉ. सतीश निचिते, केतकी भगत, सिद्धी पाटील, प्राची केणी, कमलाकर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
अलिबाग शहर पुरोगामी युवक संघटनेचे शहरप्रमुख कपिल अनुभवे आणि सहप्रमुख युगांत म्हात्रे यांनी या उपक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला.









