हटाळे शाळेचे विद्यार्थी पोहोचले इस्रोच्या अंतराळविश्वात!


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील नागाव केंद्रांतर्गत असलेल्या रायगड जिल्हा परिषद, आयएसओ मानांकित उच्च प्राथमिक शाळा हटाळे येथील विद्यार्थी भारताच्या अंतराळ संशोधनाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रापर्यंत पोहोचले. भारताच्या अंतराळ संशोधनाची ऐतिहासिक परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचे कार्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याने हटाळेच्या विद्यार्थ्यांनी अवकाशाला गवसणी घातली आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम यांच्या माध्यमातून हटाळे शाळेतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राच्या शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली होती. पुणे येथील ए. एस. एम. इन्स्टिट्यूटमध्ये १७ ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट सहभाग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या कामगिरीच्या जोरावर या विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा भेटीची संधी मिळाली.

हटाळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बुधवारी (ता.१८) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राला भेट दिली. या विशेष शैक्षणिक उपक्रमासाठी नवनाथ महेंद्र भगत (इयत्ता सहावी), दक्ष संतोष नाईक (इयत्ता सहावी) आणि विराज संजय दिवटे (इयत्ता पाचवी) या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यांच्यासोबत मार्गदर्शक शिक्षक डॉ. संदीप दत्तात्रेय वारगे, शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर, पालक महेंद्र विश्वनाथ भगत, संतोष रमेश नाईक आणि खगोलप्रेमी शिक्षिका रेश्मा वारगे यांनीही या शैक्षणिक भेटीत सहभाग घेतला.

या भेटीदरम्यान प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिलीप देशमुख, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. महेंद्र कुमार, डॉ. सुरेश कुमार तसेच अन्य मार्गदर्शक शास्त्रज्ञांशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. चांद्रयान मोहीम, विविध प्रकारचे उपग्रह, रॉकेट निर्मिती व कार्यपद्धती, उपग्रह प्रक्षेपणाची प्रक्रिया, मिशन कंट्रोल यंत्रणा, अंतराळ संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांविषयी विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

हटाळे शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण समिती सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे (प्राथमिक), शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी सुनील भोपाळे, उपशिक्षणाधिकारी सुनीता चांदोरकर, अलिबाग गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, जिल्हा शिक्षण सल्लागार समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ, सरपंच हर्षदा मयेकर, केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थानी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.