अलिबाग (रायगड) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अलिबाग शहरात उत्साहात आणि अभिमानाने अभिवादन करण्यात आले. शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली.
या प्रसंगी अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे तसेच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानिक योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांमुळे समाजात समता, बंधुता आणि न्याय यांची जाणीव निर्माण झाली असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनातूनच देशाला प्रगतीचा मार्ग मिळाल्याचेही सांगण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमामुळे अलिबागमध्ये सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.






