३५ वर्षांनंतरच्या ऐतिहासिक विजयावर मातोश्रीत कौतुक; अलिबाग विकासासाठी उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन


अलिबाग (प्रतिनिधी) : दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर ॲड. संदीप पालकर व ॲड. श्वेता पालकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री येथे सदिच्छा भेट घेतली. तब्बल ३५ वर्षांनंतर अलिबाग नगरपरिषदेत मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करत कौतुक केले.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच अलिबाग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणी, वीज व स्वच्छता या मूलभूत सुविधांवर प्राधान्याने काम करण्याचे आवाहन केले. पर्यटनाच्या दृष्टीने अलिबागची क्षमता लक्षात घेऊन या क्षेत्राचा विकास करण्यावरही त्यांनी भर दिला.
या भेटीत सुमारे २५ मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचा साधेपणा, नम्रता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली जाण याची प्रचिती आल्याची भावना पालकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रमुखांच्या हस्ते शिवबंधन बांधून अलिबाग येथील उद्योजक जितेंद्र जैन, वैभव नाईक यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.