रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांना सकारात्मक यश मिळत असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेषतः तीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे अधिक संवेदनशीलतेने लक्ष देण्यात येत असून, त्यांच्या नियमित तपासणीसह योग्य उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
अंगणवाडी सेविका गावागावात जाऊन कुपोषित बालकांच्या कुटुंबांना भेट देत आहेत. या गृहभेटीद्वारे पालकांना पोषण, स्वच्छता आणि योग्य आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच, गंभीर कुपोषण असलेल्या बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांची विशेष देखभाल केली जाते.
अंगणवाड्यांमध्ये बालकांना ताज्या व पौष्टिक आहाराची सुविधा दिली जात असून, घरीही त्यांना पोषक अन्न मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे बालकांच्या आरोग्यात सुधारणा होत असून कुपोषणाचे प्रमाण घटत आहे.
महिला व बाल कल्याण विभागाच्या या उपक्रमांमुळे पालकांमध्ये जागरूकता वाढत असून, बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. भविष्यातही अशाच पद्धतीने कुपोषणमुक्त रायगडसाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे निर्मला कुचिक यांनी सांगितले.






