पुणे (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंधन बचतीच्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना अनेक नेत्यांच्या दिखाऊ भूमिकेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “गेल्या चार वर्षांपासून माझ्या ताफ्यात फक्त तीनच गाड्या आहेत. आता इतर नेते किती दिवस हे आवाहन पाळतात, ते पाहावं लागेल,” असे वक्तव्य त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना केले.
देशात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून इंधन बचतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी स्वतः साधेपणाचा अवलंब केल्याचे सांगत, राजकीय नेत्यांनी केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीतून उदाहरण घालून द्यावे, असा सूचक संदेश दिला.
पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक नेत्यांचे मोठे ताफे, वाहनांची उधळपट्टी आणि इंधनाचा वाढता वापर यावरून नेहमीच टीका होत असते. अशा परिस्थितीत पवार यांनी स्वतःच्या ताफ्याचा उल्लेख करत केलेले विधान हे इतर नेत्यांसाठी टोला मानले जात आहे.
सध्या देशभरात इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि अनावश्यक वाहन वापर टाळण्याचे आवाहन केले जात असताना, शरद पवार यांच्या वक्तव्याने या चर्चेला आणखी धार मिळाली आहे.





