अलिबाग (प्रतिनिधी): तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कै. सुलभा प्रभाकर पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी पंडित पाटील यांनी कै. सुलभा काकू यांच्या कार्याचा आणि त्यांच्या साध्या, प्रेमळ स्वभावाचा उल्लेख करत अनेक आठवणींना उजाळा दिला.

कै. सुलभा पाटील यांनी आयुष्यभर कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजातील प्रत्येक व्यक्तीशी आत्मीयतेचे संबंध जपले. त्यांच्या घरातील आदरातिथ्य आणि प्रेमळ स्वभावामुळे अनेक दिग्गज नेते त्यांच्याशी जोडले गेले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार हे अलिबाग दौऱ्यावर आले की सुलभा काकूंच्या घरी आवर्जून भेट देत असत.तसेच राज्याचे दिग्गज नेत्यांचा कोणत्याही अपेक्षेवीना पाहुणचार करीत होत्या. त्यांच्या हातचे जेवण घेतल्याशिवाय अनेक नेत्यांचा दौरा पूर्ण होत नसे, अशी आठवण यावेळी सांगण्यात आली.

पंडित पाटील म्हणाले की, सुलभा काकूंनी माणुसकी, आपुलकी आणि सेवाभाव या मूल्यांचा वारसा जपला. त्यांनी कधीही राजकीय पद किंवा प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही, मात्र त्यांच्या वागणुकीतून आणि प्रेमळ स्वभावातून त्यांनी असंख्य माणसे जोडली. त्यांच्या स्मृती आजही अनेकांच्या मनात कायम आहेत.
पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी कै. सुलभा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





